Wednesday, 2 January 2013


सोन-पिवळ्या पाउलखुणा,
अन लाल-केशरी ठसे उमटवीत
निघाला तो दिनकर...
पाठ शिवनीचा खेळ खेळत
उन्हही मग गारठली
गारगार हवेत...
पाखरांचे थवे उडाले किलबिलत,
गाईंचे कळपहि निघाले
उंडारत,हंबारत. ...
हळूच चंद्रही घेऊन आला
रात्रीला आपल्या कुशीत...
चांदण्याहि आल्या थोड्या खुशीत....
गारवाही मग हवेतला विरत गेला
गोठलेल्या थंडीत....
अंधारलेल्या चौकटीत आकाशाच्या,
अवचितच दिसले पंख
इवलेसे,
अन ऐकू आली हळूच
जीवघेणी फडफड....
एकटच ते पाखरू,
थकलेल्या पंखांनी
लढताना दिसल
गारठलेल्या थंडीशी
अन अंधारलेल्या रात्रीशी....
'कारे तू एकटाच फिरतोय असा?'
जरा काळजीनच मी विचारलं,
भरकटलास कि रेंगाळलास तू ?
राहिलास मागे, कि सोडलाय तुला त्यांनी?
असं वाटलं त्यानही ते ऐकलं!
थकलेला दिसतोस खरा, मग
वाट कशाची बघतोय?
जा बघू, घरी जा तू आपला...
नको काळजी करू चिमण-चाऱ्याची
वाट बघून तुझी,
पिले असतील घाबरली....
माहितीये ना तुला माणुसकी
आहे आता संपलेली....
जा तू, असेल तेवढा चारा घेऊन,
आज घेतील पिले तुझी
आहे त्यातच भागवून...
जा तू परतून आपल्या घरट्यात
सांभाळ त्यांना या गारठलेल्या अंधारात....
घरी जाऊन आपल्या
काळजी घे पिलांची...
सांभाळ त्यांना
या अंधारलेल्या जगात....

इवलीशी मान आपली हलवून
इवलसं ते पाखरू,
अंधारात मिसळल,
थकलेले पंख ताणत,
बळ हत्तीचं घेऊन उडालं...
घरट्याशी त्याला पाहून,
मी हि निश्वास सोडला
पावलंहि माझी मग
झरझर वळाली
घराच्या दिशेला......
----------------सोनाली घुले/ देशमुख
/११/२०१२

No comments:

Post a Comment